मागे (Home)
भगवान विष्णूआरती~5 मिनिटे

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म (दशावतार आरती)

रचनाकार: बहिरवी जान्हवी (Bahiravi Janhavi)

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।

भक्तसंकटीं नाना स्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥

अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।

वेद नेले चोरूनी ब्रह्मा आणिणियां देसी ।

मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी ।

हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ॥ धृ. ॥

रसातळाशीं जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।

परोपकारासाठीं देवा कांसव झालासी ।

दाढें धरूनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ।

प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ॥ धृ. ॥

पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी ।

भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळीं नेसी ।

सर्व समर्पण केलं म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।

वामनरूप धरूनी बळिच्यद्वारीं तिष्ठसी ॥ ३ ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ॥ धृ. ॥

सहस्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।

कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ।

निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।

सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ॥ धृ. ॥

मातला रावण सर्वां उपद्रव केला ।

तेहतीस कोटी देव बंदीं हरलें सीतेला ।

पितृवचनालागीं रामें वनवास केला ।

मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ॥ ५ ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ॥ धृ. ॥

देवकीवसुदेव बंदीमोचन त्वां केलें ।

नंदाघरीं जाउन निजसुख गोकुळा दिधलें ।

गोरसचोरी करीतां नवलक्ष गोपाळ मिळविले ।

गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ॥ धृ. ॥

बौद्ध कलंकी कलियुगिं । झाला अधर्म हा अवघा ।

सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ।

म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनि कलंकी केशवा ।

बहिरवि जान्हवि द्यावि निजसुखानन्दसेवा ॥ ७ ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ॥ धृ. ॥

चरण1/8

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस