आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु माझा वेधा ॥
आरती ज्ञानराजा ॥ ध्रु० ॥
लोपले ज्ञान जगीं । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ॥ १ ॥
आरती ज्ञानराजा ॥ ध्रु० ॥
कनकाचें ताट करीं । उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरहो । सामगायन करी ॥ २ ॥
आरती ज्ञानराजा ॥ ध्रु० ॥
प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्माचि केलें ।
राम जनार्दनीं । पायीं मस्तक ठेविलें ॥ ३ ॥
आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा ॥ ध्रु० ॥