आरती संग्रह

Aarti Sangraha

मागे (Home)
संत गजानन महाराज (शेगाव)•आरती•~4 मिनिटे

गजानन महाराजांची आरती (जय जय सच्चितस्वरूप स्वामी गणराया)

रचनाकार: संत दासगणू महाराज (Sant Das Ganu Maharaj)

जय जय सच्चितस्वरूप स्वामी गणराया ।

अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ॥ जय देव ॥ धृ. ॥

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।

स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी ।

तें तूं खरोखर निःसंशय अससी ।

लीलामात्रें धरिलें मानव देहासी ॥ १ ॥

जय जय सच्चितस्वरूप स्वामी गणराया ।

अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ॥ धृ. ॥

होऊं न देशी त्याची जाणिवा तूं कवणा ।

करुनी गणि गण गणात बोते या भजना ।

धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना ।

जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना ॥ २ ॥

जय जय सच्चितस्वरूप स्वामी गणराया ।

अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ॥ धृ. ॥

लीला अनंत केल्या बंकटसदनास ।

पेटविले त्या अग्नीवांचुनि चिलमेस ।

क्षणांत आणिले जीवन निर्जल वापीस ।

केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥ ३ ॥

जय जय सच्चितस्वरूप स्वामी गणराया ।

अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ॥ धृ. ॥

व्याधि वारुन केले कैकां संपन्न ।

करविलें भक्तांलागी विठ्ठल दर्शन ।

भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण ।

स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥ ४ ॥

जय जय सच्चितस्वरूप स्वामी गणराया ।

अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ॥ धृ. ॥

चरण1/5

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस