जयदेवी हरितालिके । सखी पार्वती अंबिके ।
आरती ओवाळीतें । ज्ञानदीपकळिके ॥ धृ. ॥
हरअर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासि ।
तेथें अपमान पावसी । यज्ञकुंडींत गुप्त होसी ॥ १ ॥
जयदेवी हरितालिके सखी पार्वती अंबिके ॥ धृ. ॥
रिघसी हिमाद्रीच्या पोटी । कन्या होसी तू गोमटी ।
उग्र तपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी ॥ २ ॥
जयदेवी हरितालिके सखी पार्वती अंबिके ॥ धृ. ॥
तापपंचाग्निसाधनें । धूम्रपानें अधोवदनें ।
केलीं बहू उपोषणें । शंभु भ्रतारकारणे ॥ ३ ॥
जयदेवी हरितालिके सखी पार्वती अंबिके ॥ धृ. ॥
लीला दाखविसी दृष्टी । हें व्रत करिसी लोकांसाठीं ।
पुन्हा वरसी धूर्जटी । मज रक्षावें संकटीं ॥ ४ ॥
जयदेवी हरितालिके सखी पार्वती अंबिके ॥ धृ. ॥
काय वर्णू तव गुण । अल्पमति नारायण ।
मातें दाखवीं चरण । चुकवावें जन्म मरण ॥ ५ ॥
जयदेवी हरितालिके सखी पार्वती अंबिके ॥ धृ. ॥