भक्तीचिये पोटीं बोध कांकडा ज्योती ।
पंचप्राण जीवेंभावें ओवाळूं आरती ॥ १ ॥
ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडूनि चरणीं ठेविला माथा ॥ धृ. ॥
काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती ।
कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥ २ ॥
ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा ॥ धृ. ॥
राही रखुमाबाई उभ्या दोन्ही दो बाहीं ।
मयूरपिच्छचामरें ढाळिती ठाईंच्या ठाईं ॥ ३ ॥
ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा ॥ धृ. ॥
विटेसहित पाय म्हणुनि भावें ओवाळूं ।
कोटी रवि शशी दिव्य उगवले हेळू ॥ ४ ॥
ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा ॥ धृ. ॥
तुका म्हणे दीप घेउनी उन्मनींत शोभा ।
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥ ५ ॥
ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा ॥ धृ. ॥