उठा उठा हो साधक । साधा आपुलालें हित ।
गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥ १ ॥
उठा उठा हो वेगेंसीं । चला जाऊं राउळासी ।
हरतिल पातकांच्या राशी । कांकड आरती पाहोनी ॥ धृ. ॥
उठोनियां हो पाहाटें । पाहा विठ्ठल उभा विटे ।
चरण तयाचे गोमटे । अमृतदृष्टी अवलोका ॥ २ ॥
उठा उठा हो वेगेंसीं चला जाऊं राउळासी ॥ धृ. ॥
जागें करा रुक्मिणीवरा । देव आहे निजसुरा ।
वेगें निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ॥ ३ ॥
उठा उठा हो वेगेंसीं चला जाऊं राउळासी ॥ धृ. ॥
पुढें वाजंत्री । ढोल दमामे गर्जती ।
होत कांकड आरती । माझ्या पंढरीरायाची ॥ ४ ॥
उठा उठा हो वेगेंसीं चला जाऊं राउळासी ॥ धृ. ॥
सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं ।
केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥ ५ ॥
उठा उठा हो वेगेंसीं चला जाऊं राउळासी ॥ धृ. ॥