पंचानन हयवाहन सुरभूषित निळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ।
मणिमल्लां मर्दुनियां जो धूसर पिवळा ।
हिरे कंकण बाशिंग सुमनांच्या माळा ॥ १ ॥
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारी दुर्जन असुरां भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥
सुरवर सत्वर वर दे मजलागी देवा ।
नाना नामें गाईन ही तुमची सेवा ।
अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारी दुर्जन असुरां भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥
रघुवीरस्मरणीं शंकर हृदय निवाला ।
तो हा मल्लांतक अवतार झाला ।
यालागीं आवडे भाव वर्णिला ।
रामीं रामदासा जिवलग भेटला ॥ ३ ॥
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारी दुर्जन असुरां भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥