ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें ।
सगुणरूप माये माझ्या जीवीं बैसलें ।
तें मज आवडतें अनुमान न बोले ।
पाहावया रूप याचें उतावीळ हो झालें ॥ १ ॥
यालागीं आरती हो कृष्णा पाही हो सखी ।
आणिक नावडे हो दुजे तिन्हीं हो लोकीं ॥ धृ. ॥
पाऊल कृष्णजीचें माझ्या जीवीं बैसलें ।
सनकादिक पाहा महा आसक्त झाले ।
मुक्त जो शुकमुनी तेणें मनीं धरिलें ।
तें मी केवीं सोडूं मज बहूरुचलें ॥ २ ॥
यालागीं आरती हो कृष्णा पाही हो सखी ॥ धृ. ॥
निर्गुण गोष्ट माये मज नावडे साचें ।
सगुण बोल कांहीं केव्हां आठवी वाचें ।
पाया लागेन तूझ्या हेंचि आर्त मनींचें ।
तेणें घडेल दास्य रमावल्लभाचें ॥ ३ ॥
यालागीं आरती हो कृष्णा पाही हो सखी ॥ धृ. ॥