अवतार गोकुळी हो । जन तारावयासी ।
लावण्यरुपडे हो । तेजःपुंजाळ राशी ।
उगवले कोटिर्बिंब । रवि लोपला शशी ।
उत्साह सुरवरां । महाथोर मानसी ॥ १ ॥
जय देवा कृष्णनाथा । राईरखुमाई कांता ।
आरती ओवाळीन । तुम्हा देवकीसुता ॥ धृ. ॥
कौतुक पहावया । भाव ब्रह्मयाने केली ।
वत्सेंही चोरूनिया । सत्यलोकासी नेलीं ।
गोपाल गाईवत्सें । दोन्ही ठाईं रक्षिली ।
सुखाचा प्रेमसिंधू । अनाथांची माऊली ॥ २ ॥
जय देवा कृष्णनाथा राईरखुमाई कांता ॥ धृ. ॥
चोरितां गोधनें हो । इन्द्र कोपला भारी ।
मेघ कडाडिला । शिला वर्षल्या धारी ।
रक्षिले गोकुळ हो । नखीं धरिला गिरी ।
निर्भय लोकपाळ । अवतरला हरी ॥ ३ ॥
जय देवा कृष्णनाथा राईरखुमाई कांता ॥ धृ. ॥
वसुदेव देवकीचे । बंद फोडिली शाळ ।
होऊनिया विश्वजनिता । तया पोटांचा बाल ।
दैत्य हे त्रासियेले । समूळ कंसासी काळ ।
राज्य हें उग्रसेना । केला मथुरापाळ ॥ ४ ॥
जय देवा कृष्णनाथा राईरखुमाई कांता ॥ धृ. ॥
तारिले भक्तजन । दैत्य सर्व निर्दाळून ।
पांडवा साहाकारी । अडलिया निर्वाणी ।
गुण मी काय वर्णू । मति केवढी वानूं ।
विनवितो दास तुका । ठाव मागे चरणी ॥ ५ ॥
जय देवा कृष्णनाथा राईरखुमाई कांता ॥ धृ. ॥