जय देवी मंगळागौरी । ओवाळीन सोनियाताटीं ।
रत्नांचे दिवे । माणिकांच्या वाती । हिरेया ज्योती ॥ धृ. ॥
मंगळमूर्ती उपजली कार्या । प्रसन्न झाली अल्पायुषी राया ।
तिष्ठली राज्यकाळी । अयोधन द्यावया ॥ १ ॥
पूजेला ग आणिली जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा ।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे ।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली ॥ २ ॥
जय देवी मंगळागौरी ओवाळीन सोनियाताटीं ॥ धृ. ॥
साळीचे तांदुळ मुगाची डाळ । आळणीं खिचडी रांधिती नारी ।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ॥ ३ ॥
जय देवी मंगळागौरी ओवाळीन सोनियाताटीं ॥ धृ. ॥
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती । कळावी कांकणें गौरीला शोभती ।
शोभली बाजुबंद । कानीं कापांचे गवे । त्यायिली अंबा शोभे ॥ ४ ॥
जय देवी मंगळागौरी ओवाळीन सोनियाताटीं ॥ धृ. ॥
न्हाउनी माखुनी मौनी बैसली । पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली ।
स्वच्छ बहुत होऊनी अंबा पूजूं लागली ॥ ५ ॥
जय देवी मंगळागौरी ओवाळीन सोनियाताटीं ॥ धृ. ॥
सोनिया ताटीं घातल्या पंचारती । मध्यें उजळती कापुराच्या वाती ।
करा धूप दीप । आतां नैवेद्य षड्रस पक्वान्नें । तटीं भरा बोनें ॥ ६ ॥
जय देवी मंगळागौरी ओवाळीन सोनियाताटीं ॥ धृ. ॥
लवलाहें तिघें काशीसी निघाली । माउली मंगळागौर भिजवूं विसरली ।
मागूती परतुनीयां आली । अंबा स्वयंभू देखिली ।
देऊळ सोनियाचे । खांब हिरेयांचे । कळस वरती मोतियांचा ॥ ७ ॥
जय देवी मंगळागौरी ओवाळीन सोनियाताटीं ॥ धृ. ॥