मागे (Home)
श्री दुर्गा / महालक्ष्मीआरती~7 मिनिटे

आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी (संपूर्ण १० दिवसांची नवरात्र आरती)

रचनाकार: विप्र रामदास (Vipra Ramdas)

आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी हो ।

प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनि हो ।

मूलमंत्रजप करूनी भोवतें रक्षक ठेऊनि हो ।

ब्रह्माविष्णुरुद्र आईंचे पूजन करिती हो ॥ १ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।

उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥

द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनि हो ।

सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।

कस्तुरीमळवट भांगी शेंदुर भरूनी हो ।

उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनि हो ॥ २ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ॥ धृ. ॥

तृतीयेचे दिवशीं अंबे शृंगार मांडिला हो ।

मळकट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।

कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो ।

अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ ३ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ॥ धृ. ॥

चतुर्थीचे दिवशीं विश्वव्यापक जननी हो ।

उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणीं हो ।

पूर्ण कृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ।

भक्तांच्या माऊलि सुर ते येती लोटांगणी हो ॥ ४ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ॥ धृ. ॥

पंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगलालिता हो ।

अर्घ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो ।

रात्रीचे समयीं करिती जागरण हरिकथा हो ।

आनंदें प्रेम तें आलें सद्भावें क्रीडता हो ॥ ५ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ॥ धृ. ॥

षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ।

घेऊनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो ।

कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफळांचा हो ।

जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥ ६ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ॥ धृ. ॥

सप्तमीचे दिवशीं सप्तशृंगगडावरी हो ।

तेथें तूं नांदसी भोवतें पुष्पें नानापरी हो ।

जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो ।

भक्तसंकटी पडतां झेलूनि घेसी वरचे वरी हो ॥ ७ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ॥ धृ. ॥

अष्टमीचे दिवशीं अष्टभुजां नारायणी हो ।

सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।

मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ।

स्तनपान देऊनि सुखी केली अंतःकरणीं हो ॥ ८ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ॥ धृ. ॥

नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो ।

सप्तशतीजप होम हवनें सद्भक्ती करूनी हो ।

षड्रस अन्न नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो ।

आचार्यब्राह्मणां तृप्त केलें कृपेंकरूनी हो ॥ ९ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ॥ धृ. ॥

दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनी हो ।

सिंहारूढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो ।

शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो ।

विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो ॥ १० ॥

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ॥ धृ. ॥

चरण1/10

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस