जाहलें भजन आम्ही नमितों चरणा । नमितों तव चरणा ।
वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना ॥ धृ. ॥
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातों । देवा तुजलाची ध्यातों ।
प्रेमें करुनियां देवा गुण तुझे गातों ॥ १ ॥
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा ॥ धृ. ॥
तरी न्यावी सिद्धी देवा हेची वासना । देवा हेची वासना ।
रक्षूनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥ २ ॥
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा ॥ धृ. ॥
मागणे तें देवा आतां एकची आहे । आतां एकची आहे ।
तरुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहें ॥ ३ ॥
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा ॥ धृ. ॥
जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया । ऐशा या ठाया ।
प्रेमानंदें लागू तुझी कीर्ती गावया ॥ ४ ॥
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा ॥ धृ. ॥
सदा ऐसी भक्ती राहो आमुच्या मनीं । आमुच्या मनीं ।
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥ ५ ॥
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा ॥ धृ. ॥
वारुनियां संकटें आतां आमुचीं सारी । आतां आमुची सारी ।
कृपेची साउली देवा दीनावरी करीं ॥ ६ ॥
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा ॥ धृ. ॥
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी । चिंता तुम्हा असावी ।
सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥ ७ ॥
निरोप घेतों आतां आम्हां आज्ञा असावी ।
चुकलें आमुचें कांहीं त्याची क्षमा असावी ॥
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा ॥ धृ. ॥