जमदग्नीकुळभूषण मुक्ता फळदशना ।
अतिसज्जन मनमोहनरजनीकरवदना ।
अगणित महिमा तुझा न कळे सुरगणा ।
वदतो कंठी वाणी सरसीरुहनयना ॥ १ ॥
जय राम श्रीराम जय भार्गवरामा ।
नीरांजन करूं तुजला परिपूर्णकामा ॥ धृ. ॥
सह्याद्रिगिरिशिखरीं शर घेऊनी येसी ।
सोडुनी शर पळवीसी पश्चिमजलधीसी ।
तुजसम रणधीर जगी न पडे दृष्टीसी ।
प्रताप थोर तुझा न कळे कवणासी ॥ २ ॥
जय राम श्रीराम जय भार्गवरामा ॥ धृ. ॥
तव कोप बहु पापी बा संहारी ।
दानव दहन करोनी वससी गिरिशिखरी ।
क्षत्रिय मारूनि अवनी केली निर्वैरी ।
सात्विक राजस तामस त्रिगुणां उद्धरी ॥ ३ ॥
जय राम श्रीराम जय भार्गवरामा ॥ धृ. ॥
दृढ भावे तव वंदन करिती जे चरणी ।
त्यांचे भवभय नाही जंवरि शशितरणी ।
शर मारुनी उद्भवली गंगा जनतरणी ।
चिंतामणि शरणागत निश्चल तव चरणी ॥ ४ ॥
जय राम श्रीराम जय भार्गवरामा ॥ धृ. ॥