काय करूं गे माय आतां कवणा ओवाळूं ।
जिकडे पाहे तिकडे राजाराम कृपाळू ॥ धृ. ॥
ओंवाळूं गे माय निजमूर्ती रामा ।
रामरूपी दुजेपणा न दिसे आम्हा ॥ १ ॥
काय करूं गे माय आतां कवणा ओवाळूं ॥ धृ. ॥
सुरवर नर वानर अवघा राम सकल ।
दैत्य निशाचर तेही राम केवळ ॥ २ ॥
काय करूं गे माय आतां कवणा ओवाळूं ॥ धृ. ॥
त्रैलोक्यस्वरूपें राम संचारला एक ।
सद्गुरुकृपें केशवराजी आनंद देख ॥ ३ ॥
काय करूं गे माय आतां कवणा ओवाळूं ॥ धृ. ॥