स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली ।
देहात्मकाभिमानें दशग्रीवें हरिली ।
सद्विवेकमारीतिनें तच्छुद्धि आणिली ।
तव चरणांबुजि येऊनि वार्ता श्रुत कली ॥ १ ॥
जय देव जय देव जय निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ धृ. ॥
उत्कट साधुनि शिळा सेतु बान्धोनि ।
लिंगदेहलंकापुरी विद्वंसोनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निवटौनि ॥ २ ॥
जय देव जय देव जय निजबोधा रामा ॥ धृ. ॥
प्रथम सीताशोधी हनुमन्त गेला ।
लंकादहन करुनी सख्या मारीला ।
वधिला जंबुमाळी भुवनी त्राहटीला ।
आनंदाची गुढी घेऊनियां आला ॥ ३ ॥
जय देव जय देव जय निजबोधा रामा ॥ धृ. ॥
निजवळें निजशक्ती सोडविली सीता ।
म्हणुनी येणें झालें अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊनि आली कौसल्या माता ॥ ४ ॥
जय देव जय देव जय निजबोधा रामा ॥ धृ. ॥
अनुहत वाजिंत्रध्वनि गर्जती अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथ कुमार ।
नगरी होत आहे आनंद थोर ॥ ५ ॥
जय देव जय देव जय निजबोधा रामा ॥ धृ. ॥