मागे (Home)
श्री रामचंद्रआरती~4 मिनिटे

उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी (श्री रामचंद्रांची आरती १)

रचनाकार: माधवदास स्वामी (Madhavdas Swami)

उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी ।

लिंगदेह लंकापुर विध्वंसूनी ।

कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।

देह अहंभाव रावण निवटूनी ॥ १ ॥

जय देव जय देव निजबोधा रामा ।

परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ धृ. ॥

प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।

लंका दहन करुनी अखया मारिला ।

मारिला जंबूमाळी भुवनीं त्राह्राटीला ।

आनंदाची गुढी घेऊनियां आला ॥ २ ॥

जय देव जय देव निजबोधा रामा ॥ धृ. ॥

निजवळें निजशक्ति सोडविली सीता ।

म्हणूनि येणें झालें अयोध्ये रघुनाथा ।

आनंदें ओसंडे वैराग्य भरता ।

आरती घेऊन आली कौसल्या माता ॥ ३ ॥

जय देव जय देव निजबोधा रामा ॥ धृ. ॥

अनाहतध्वनी गर्जती अपार ।

अठरा पद्म वानर करिती भुभुःकार ।

अयोध्येसी आले दशरथकुमार ।

नगरीं होत आहे आनंद थोर ॥ ४ ॥

जय देव जय देव निजबोधा रामा ॥ धृ. ॥

सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।

सोऽहंभावें तया पूजा उपचार ।

सहजांची आरती वाद्यांचा गजर ।

माधवदासा स्वामी आठव ना विसर ॥ ५ ॥

जय देव जय देव निजबोधा रामा ॥ धृ. ॥

चरण1/5

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस