फळलें भाग्य माझें धन्य झालों संसारी ।
सद्गुरु भेटला हो तेणें धरियेलें करीं ।
पश्चिमे चालवीलें आत्मस्तुती निर्धारीं ।
त्रिकुटावरी नांद देखियेला पंढरी ॥ १ ॥
तें सुख काय सांगूं वाचे बोलता न ये ।
आरतिचेनि गुणें गेलें मीपण माये ॥ धृ. ॥
राऊळामाजीं जातां राहे देह अवस्था ।
मन हें उन्मन झालें नसे बहुत्वेची वार्ता ।
हेतु हा मावळला शब्दा आली निःशब्दता ।
तटस्थ होऊनि ठेलों नीजरूप पहातां ॥ २ ॥
तें सुख काय सांगूं वाचे बोलता न ये ॥ धृ. ॥
त्रिगुण गुण बाई पूर्ण जळत्या वाती ।
नवलाव अविनाश न समायें समंज्योती ।
पाहतां लक्ष तेथें हालूं विसरली पांती ।
नातुडे माझें नाही दिवसराती ॥ ३ ॥
तें सुख काय सांगूं वाचे बोलता न ये ॥ धृ. ॥
आरती सद्गुरुचि उजळली अंतरीं ।
प्रकाश थोर झाला सांठवेना अंबरीं ।
रविशशि मावळले तया तेजामाझारीं ।
वाजती दिव्य वाद्ये अनुहाते गजरी ॥ ४ ॥
तें सुख काय सांगूं वाचे बोलता न ये ॥ धृ. ॥
आनंदसागरांत प्रेमें दीधली बुडी ।
लाधलें सौख्य मोठें न ये बोलीं ।
सद्गुरुचेनि संगें ऐसी आरती केली ।
निवृत्तीनें आनंदाची तेथे वृत्ति निमाली ॥ ५ ॥
तें सुख काय सांगूं वाचे बोलता न ये ॥ धृ. ॥