आरती साई बाबा ।
सौख्यदातार जीवा । चरणरजातली ।
द्यावा दासां विसावा । भक्तां विसावा ॥ आरती साई बाबा ॥ धृ. ॥
जाळुनियां अनंग । स्वस्वरूपीं राहे दंग ।
मुमुक्षुजन दावी । निज डोळां श्रीरंग ॥ १ ॥
आरती साई बाबा । सौख्यदातार जीवा ॥ धृ. ॥
जया मनीं जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी तुझी ही माव , तुझी ही माव ॥ २ ॥
आरती साई बाबा । सौख्यदातार जीवा ॥ धृ. ॥
तुमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथां , दाविसी अनाथां ॥ ३ ॥
आरती साई बाबा । सौख्यदातार जीवा ॥ धृ. ॥
कलियुगीं अवतार । सगुण परब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर , दत्त दिगंबर ॥ ४ ॥
आरती साई बाबा । सौख्यदातार जीवा ॥ धृ. ॥
आठां दिवसां गुरुवारीं । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी , भय निवारी ॥ ५ ॥
आरती साई बाबा । सौख्यदातार जीवा ॥ धृ. ॥
माझा निजद्रव्य ठेवा । तव चरणरजसेवा ।
मागणे हेची आतां । तुम्हां देवाधिदेवा , देवाधिदेवा ॥ ६ ॥
आरती साई बाबा । सौख्यदातार जीवा ॥ धृ. ॥
इच्छित दीन चातक । निर्मळ तोय निजसुख ।
पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक , आपुली भाक ॥ ७ ॥
आरती साई बाबा । सौख्यदातार जीवा ॥ धृ. ॥