मागे (Home)
भगवान विष्णूआरती~5 मिनिटे

जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा (श्री सत्यनारायण आरती)

रचनाकार: मोरेश्वरसुत वासुदेव (Moreshwarsut Vasudev)

जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा ।

पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥ धृ. ॥

विधियुक्त पूजनी करिती पुराण श्रवण ।

परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ।

घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण ।

प्रसाद भक्षण करितां प्रसन्न तूं नारायण ॥ १ ॥

जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा ॥ धृ. ॥

शतानंद विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ।

दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ।

त्यापासुनि हें व्रत या कलियुगि सकळां श्रुत झालें ।

भावार्थे पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥ २ ॥

जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा ॥ धृ. ॥

साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ।

इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ।

त्या पापार्ने संकटी पडुनी दुःखहि भोगिलें ।

स्मृति होऊनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्धरिलें ॥ ३ ॥

जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा ॥ धृ. ॥

प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ।

क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ।

अंगध्वजरायाची यापरि दुःखस्थिति आली ।

मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसली ॥ ४ ॥

जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा ॥ धृ. ॥

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ।

पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ।

अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ।

ऐसा भक्तां संकटीं पावसि तूं चक्रपाणी ॥ ५ ॥

जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा ॥ धृ. ॥

अनन्यभावें पूजुनि हें व्रत जे जन आचरति ।

इच्छित पुरविसी त्यांतें देउनि संतति संपत्ती ।

संहरती भवदुरितें सर्वहि बंधनें तुटती ।

राजा रंका समान मानुनि पावसी श्रीपती ॥ ६ ॥

जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा ॥ धृ. ॥

ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णू मी कैसा ।

भक्तिपुरस्सर आचरती त्यां पावसि जगदीशा ।

भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ।

मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥ ७ ॥

जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा ॥ धृ. ॥

चरण1/8

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस