जय देवी जय देवी जय भगवद्गीते ।
आरती ओवाळूं तुज वेदमाते ॥ धृ. ॥
सुखकरणी दुखहरणी जननी वेदांची ।
अगाध महिमा तुझा नेणे विरंची ।
ते तूं ब्रह्मी होतिस लीन ठायींची ।
अर्जुनाचें भावें प्रकट मुखींची ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय भगवद्गीते ॥ धृ. ॥
सात शंतें श्लोक व्यासोक्तीसार ।
अष्टादश अध्याय इतुका विस्तार ।
अर्ध पाद करितां उच्चार ।
स्मरणमात्रें त्यांच्या निरसे संसार ॥ २ ॥
जय देवी जय देवी जय भगवद्गीते ॥ धृ. ॥
काय तुझा पार नेणें मी दीन ।
अनन्यभावें तुजला आलों मी शरण ।
सनाथ करीं माये कृपा करून ।
बापरखुमादेवीवरदासमान ॥ ३ ॥
जय देवी जय देवी जय भगवद्गीते ॥ धृ. ॥