मागे (Home)
संत तुकाराम महाराजआरती~4 मिनिटे

प्रपंचरचना सर्वहि भोगूनि त्यागिली (संत तुकाराम आरती २)

रचनाकार: संत निळोबाराय (Sant Nilobaray)

प्रपंचरचना सर्वहि भोगूनि त्यागिली ।

अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धि हरविली ।

वैराग्याची निष्ठा प्रगटुनि दाखविली ।

अहंममता दवडुनि निजशान्ती वरीली ॥ १ ॥

जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा ।

तारक तू सकळांचा जिवलग सोयरा ॥ धृ. ॥

हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला ।

विरक्त ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला ।

जगदुद्धारालागीं उपाय सुचविला ।

निंदक दुर्जनाचा संदेह निरसीला ॥ २ ॥

जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा ॥ धृ. ॥

तेरा दिवस वह्या रक्षुनियां उदकीं ।

कोरड्याचि काढुनि दाखविल्या शेखी ।

अपार कविताशक्ति मिळवुनि इहलोकीं ।

कीर्तन श्रवणें तुमच्या उद्धरति जन लोकीं ॥ ३ ॥

जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा ॥ धृ. ॥

बाळवे घेऊनि श्रीहरी भेटला ।

विधि जनिता तोचि आठव हा दीधला ।

तेणें ब्रह्मानन्दे प्रेमा डोलविला ।

न तुके म्हणोनि तुका नामीं गौरविला ॥ ४ ॥

जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा ॥ धृ. ॥

प्रयाणकाळीं देवें विमान पाठविलें ।

कळिच्या काळामध्ये अद्भुत वर्तविलें ।

मानव देह घेऊनि निजधामा गेले ।

निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥ ५ ॥

जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा ॥ धृ. ॥

चरण1/5

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस