मागे (Home)
भगवान शिवआरती~3 मिनिटे

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो (श्री शंकर आरती ३)

रचनाकार: गोसावीनंदन (Gosavinandan)

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ।

त्रिशूल पाणी शांभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ।

वृषभारुढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो ।

विभूतिमाळाजटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ धृ. ॥

पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरी हो ।

त्याने तप मांडिले ध्याना आणि तुज अंतरी हो ।

प्रसन्न होऊनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ।

औदुंबरमुळी प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ १ ॥

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ॥ धृ. ॥

धन्य कुशार्वाताचा महिमा वाचे वर्णू किती हो ।

आणिकही बहुतीतें गंगाद्वारादिक पर्वती हो ।

वंदन मार्जन करिती त्याचे महादोष नासती हो ।

तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ २ ॥

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ॥ धृ. ॥

ब्रह्मगिरींची भावें ज्याला प्रदक्षिणा जरी घडे हो ।

तें ते काया कष्टें जंव जंव चरणी रुपती खडे हो ।

तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्याचें झडे हो ।

केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पाया पडे हो ॥ ३ ॥

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ॥ धृ. ॥

लावूनिया निजभजनी सकळही पुरविसी मनकामना हो ।

संतति संपत्ति देसी अंती चुकविसी यमयातना हो ।

शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो ।

गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ ४ ॥

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ॥ धृ. ॥

चरण1/5

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस