मागे (Home)
श्री हनुमानस्तोत्र~5 मिनिटे

श्री मारुती स्तोत्र (भीमरूपी महारुद्रा - समर्थ रामदास स्वामी संपूर्ण १७ श्लोक)

रचनाकार: समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami)

भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती ।

वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १ ॥

महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।

सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका ॥ २ ॥

दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा ।

पाताळदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥ ३ ॥

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।

पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥ ४ ॥

ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।

काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें ॥ ५ ॥

ब्रह्मांडें माइलीं नेणों आवळे दंतपंगती ।

नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥ ६ ॥

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।

सुवर्णकटिं कांसोटी घंटा किंकिणी नागरा ॥ ७ ॥

ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू ।

चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८ ॥

कोटिच्या कोटि उड्डाणें झेपावे उत्तरेकडे ।

मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९ ॥

आणिला मागुती नेला आला गेला मनोगती ।

मनासी टाकिलें मागें गतीसी तुळणा नसे ॥ १० ॥

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।

तयासी तुळणा कोठें मेरुमंदार धाकुटे ॥ ११ ॥

ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके ।

तयासी तुळणा कैची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ १२ ॥

आरक्त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।

वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥ १३ ॥

धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समस्तही ।

पावती रूपविद्यादी स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४ ॥

भूतप्रेतसमंधादी रोगव्याधी समस्तही ।

नासती तूटती चिंता आनंदें भीमदर्शनें ॥ १५ ॥

हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी ।

दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणें ॥ १६ ॥

रामदासी अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।

रामरूपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती ॥ १७ ॥

॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ॥

चरण1/4

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस