मागे (Home)
संत ज्ञानेश्वर महाराजस्तोत्र~3 मिनिटे

पसायदान (आतां विश्वात्मकें देवें - संत ज्ञानेश्वर)

रचनाकार: संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar)

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ २ ॥

दुरितांचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्य पाहो ।

जो जे वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥

वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ॥ ४ ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गांव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकीं ।

भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥ ८ ॥

येथ म्हणे श्रीविश्वेशराओ । हा होईल दानपसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाहला ॥ ९ ॥

चरण1/3

आरती संग्रह ॲप इन्स्टॉल करा

ऑफलाइन पठण, जलद अनुभव व होम स्क्रीन ॲक्सेस