उठा उठा हो गजानना, सरली ती राती ।
दयाळा, उषःकालचा वाहे वारा कुक्कुट ओरडती ॥ ध्रु० ॥
सूर्यसारथी अरुणा पाहून प्राची निजचित्ती ।
गेला होऊनि अति आनंदित, तें मी वाणू किती ॥ १ ॥
उलूक पिंगळे झाले भयभीत पाहून अरुणाला ।
प्राची प्रांत तो सद्गुरुराया लालीलाल झाला ॥ २ ॥
चक्रवाक चंडोल पक्षी ते प्रभातकालाला ।
सूर्या बघण्या आतुर होऊनि घालिती घिरट्याला ॥ ३ ॥
उठा उठा हो गजानना, सरली ती राती ॥ ध्रु० ॥
तेवीं बघण्या तुला पातले भक्त तुझे द्वारीं ।
दर्शन देउनि तयास तारा गणू म्हणे संसारीं ॥ ४ ॥
उठा उठा हो गजानना, सरली ती राती ॥ ध्रु० ॥