येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ धृ. ॥
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ॥ २ ॥
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवेंभावें ओवाळी ॥ ३ ॥
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ॥ ४ ॥
नामा म्हणे सांगूं काय तुझी लीला ।
कौसल्याचा राम पांडुरंग झाला ॥ ५ ॥