उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां ।
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥ १ ॥
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा ।
सोडा सेजसुख आतां पाहूं द्या मुखकमळा ॥ २ ॥
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां ॥ ध्रु० ॥
रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी ।
मन उतावीळ रूप पाहावया दृष्टी ॥ ३ ॥
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां ॥ ध्रु० ॥
राही रखुमाबाई तुम्हां येऊं द्या दया ।
सेज हालवुनी जागे करा देवराया ॥ ४ ॥
गरुड हनुमंत उभे पाहती वाट ।
स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥ ५ ॥
झाकें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।
विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥ ६ ॥
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥ ध्रु० ॥